राजगुरूनगरात महाविकास “आघाडी’ की “बिघाडी’?

नगरपरिषदेचा बिगुल वाजल्याने कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा निर्णयाकडे लागून

पुणे  – राजगुरूनगर नगरपरिषदेचे बिगुल वाजले आहेत. निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली आहे. त्यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सदस्यांना जोरदार फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एका “धाग्या’त बांधले गेले आहे. तर सर्व निवडणुका महाविकास आघाडी खालीच लढणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ते कितपत रुचेल अन्‌ खेड तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे “सख्ख’ सर्वश्रुत असल्याने महाविकास आघाडीत “बिघाडी’ होणार का, की एकाच “छताखाली’ लढणार हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

राजगुरूनगर नगरपरिषदेच्या 18 जागा आहेत. यात भाजप 14 शिवसेना 2 व अपक्ष 2 असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. मात्र, त्यावेळी निवडणुकीत भाजप 7, शिवसेना 2 व उर्वरीत 9 अपक्ष असे सदस्य निवडून आले होते. तर राष्ट्रवादीचे कोणीही निवडून आले न्हवते. तर अपक्षांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची नगरपरिषदेवर सत्ता आहे.
खेड तालुक्‍याचे कारभारी (आमदार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप मोहिते पाटील आहेत. त्यामुळे राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार “घड्याळा’च्या चिन्हावर तर शिवसैनिकही “धनुष्यबाणा’च्या चिन्हावर मैदानात उतरण्यास सज्ज आहेत.

मात्र, राज्यात महाविकास आघाडीच्या छाताखाली तीन पक्ष असून या तिघांमधील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेड तालुक्‍यात सारखेच प्राबल्य आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत एकममेकांना हारवण्यासाठी हे दोघेही कायमच एकमेकांवर कुरघोड्या करीत असताता. मात्र, सध्या सत्तेत एकत्र असल्याने राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक नेते काय भूमिका घेतात अन्‌ वरिष्ठांकडून काय निर्णय येणार याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

खेड तालुक्‍यात ज्यापद्धतीने शिवसेना व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, त्याच पद्धतीने भाजपने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप ताकदीनिषी मैदानात उतरून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातच जर महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर “बिघाडी’ झाली तर ती भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. आणि जर महाविकास आघाडीच्या छताखाली तिन्ही पक्ष एकत्र लढले तर राजगुरूनगर नगरपरिषदेत सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे.

… तर शिवसेना-राष्ट्रवादीचे सूत जुळणार का?
राजगुरूनगर नगरपरिषदेची निवडणूक जर महाविकास आघाडीने एका “दोऱ्या’मध्ये लढली तर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांचे “सूत’ जुळणार का आणि जर हे “सूत’ वरिष्ठांच्या दबावामुळे जुळले तर त्याचा फटका ऐन निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे निवडणूक लागण्याच्या आगोदरच जर “महाविकास आघाडी’ की “स्वतंत्र’ याचा निर्णय झाल्यास कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यापद्धतीने “फिल्डिंग’ लावणे सोपे जाणार आहे.

पक्षांतराला पेव फुटणार?
राज्यात जेव्हा भाजप सत्तेत होता तेव्हा पक्षांतराला चांगलेच पेव फुटले होते. मात्र, सध्या भाजपचा सत्तेतून पायउतारा झाल्याने पक्षांताराचे पेव पुन्हा उलटदिशेने फिरले आहेत. त्यातच राजगुरूनगर परिषदेचे बिगूल वाजले असून आरक्षणही जाहीर झाले आहे, त्यामुळे राजगुरूनगरात पक्षांतरला “पेव’ फुटण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत सर्वपक्षांमध्ये छोटे-मोठे फेरबदल दिसण्याची शक्‍यता आहे.

हे पाहणे औत्सुक्‍याचे
राज्यात भाजपला “नामोहरण’ करण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने “हात’ मिळवणी करीत सत्ता स्थापन केली. तर आतापर्यंत हा “पॅटर्न’ काही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यशस्वी झाला आहे. त्यामुळे राजगुरूनगरात नगरपरिषदेवरील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हा “पॅटर्न’ राबला जाण्याची शक्‍यता अधिक आहे. तर भाजप काही खास “व्युह’ रचना आखून हा महाविकास आघाडीच्या “वारू’ला नगरपरिषदेच्या निवडणुकीद्वारे लगाम घालणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.