नवी दिल्ली – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार आणि अन्य 12 जणांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी नवीन आरोपपत्र दाखल केले. या सर्वांवर दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार उर्फ सतविंदरजीत सिंग यांच्या व्यतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये जगदीप सिंग उर्फ जग्गू भगवानपुरिया, सचिन थापन उर्फ सचिन बिश्नोई, अनमोल बिश्नोई उर्फ भानू, विक्रमजीत सिंह उर्फ विक्रम ब्रार, संदीप झांझरिया उर्फ काला जथेरी, वीरेंद्र प्रताप सिंह उर्फ कला राणा, जोगिंदर सिंह, राजेश कुमार उर्फ राजू मोटा, राज कुमार उर्फ राजू बसो, अनाजी बसोली उर्फ राजू यादव आणि शाहबाज अन्सारी उर्फ शाहबाज यांचा समावेश आहे.
दहशत पसरवणे आणि हाय प्रोफाईल लोकांना लक्ष्य करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशात बंदी घालण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि इतर अनेक खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांशी या लोकांचे संबंध असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
या सर्व 14 आरोपींवर दहशतवाद पसरवण्याचा आणि सामाजिक आणि धार्मिक नेते, चित्रपट अभिनेते, गायक आणि व्यावसायिकांच्या हत्या घडवून आणण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच कॅनडा, नेपाळ आणि इतर देशांतील खलिस्तान समर्थक घटकांच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत दहशतवादी कारवायात सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.