मुंबई – लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले, सुरेखाताईं पुणेकर यांचे मंचावरील काम महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्य सरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपर् सुरु ठेवली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जसे सर्व जाती-धर्मातील लोक आहेत. त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही शरद पवारसाहेबांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रवेशानंतर सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझे स्वप्न होते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ते आज पूर्ण झाले आहे. दरेकरांनी जे म्हटले ते ऐकून वाईट वाटले. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसे बोलायला नको होते, असे पुणेकर म्हणाल्या.