आंध्रात विधान परिषद बरखास्त करण्याचा सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचा निर्णय

आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने आज राज्य विधिमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधान परिषदेच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची घटना ताजी असतानाच आज राज्य सरकारने विधान परिषदच बरखास्त करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. आज सकाळी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठिकेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिकृत माहिती वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी दिली.

५८ सदस्यीय विधान परिषदेमध्ये वायएसआर काँग्रेसचे केवळ ९ सदस्य असल्याने सरकारचे कनिष्ठ सभागृहामध्ये पारित करण्यात आलेले निर्णय वरिष्ठ सभागृहामध्ये अडकून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आंध्र प्रदेशला ३ राजधान्या असाव्यात असा निर्णय कनिष्ठ सभागृहामध्ये संमत करून घेतला होता मात्र वरिष्ठ सभागृहामध्ये बहुमत नसल्याने हा निर्णय विधान परिषदेत टांगणीवर पडला होता.

याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी, ‘वरिष्ठ सभागृह जर अशाप्रकारे निर्णय टांगणीवर टाकणार असेल तर या सभागृहावरील वार्षिक ६० कोटींचा व एकूण ३०० कोटींचा निधी पाण्यात जात आहे असंच समजावं लागेल.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

वायएसआर काँग्रेसचा विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय विधानसभेमध्ये बहुमत असल्याने एकदिवसीय चर्चेनंतर संमत करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशामध्ये सध्याच्या घडीला केवळ ६ राज्यांमध्ये विधिमंडळाची दोन्ही सभागृहं अस्तित्वात असून बहुतेक राज्यांनी विधान परिषद बरखास्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here