पिंपरी – सत्ताबदलानंतर संभाव्य मंत्रिमंडळाची यादी सोशल मीडियावर फिरू लागली आहे. या यादीमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष महेश लांडगे यांना नगरविकास विभागाचे राज्यमंत्री करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. सोमवारी (दि.4) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत संभाव्य यादी तयार करण्यात आली असून 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावून त्या ठिकाणी शिवसेना बंडखोर व भाजपाचे सरकार राज्यात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर या सरकारने विश्वासदर्शक ठरावाचे दिव्यही पार पाडले. आता त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिंदे गट आणि भाजपामध्ये अनेक इच्छुक असल्यामुळे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सोमवारी (दि. 4) देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडे नगरविकास विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगण्यात येत आहे. महेश लांडगे यांची वर्णी लागल्यास पिंपरी-चिंचवड शहराला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे शहर भाजपातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहराला मिळेल का पहिल्यांदाच संधी?
पिंपरी-चिंचवड शहराची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकाही आमदाराला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळालेली नाही. भाजपाच्या सत्ताकाळात महेश लांडगे यांच्या रुपाने शहराला संधी मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महेश लांडगे यांना संधी मिळाल्यास होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला त्याचा निश्चितच फायदा होणार असून भविष्यातील
2024 च्या लोकसभा निवडणुकीतही शिरूर मतदारसंघावर ताबा मिळविण्यासाठी ही निवड निश्चित फायदेशीर ठरू शकते, असे मत व्यक्त होत आहे.