लोणावळा – सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा- पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने यावेळी घटनास्थळी कोणी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मागील 24 तासांत लोणावळा शहर, परिसरात 166 मिलिमीटर तर पवना धरण परिसरात 98 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुधिवरे खिंड ही लोणावळा आणि पवना धरण भागाला जोडणारी खिंड असून पवनानगर परिसरातील सर्व गावांना लोणावळ्यात येण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग आहे. लोणावळा भागातून मोठ्या संख्येने पर्यटक पवना धरणाचा जलाशय पाहण्यासाठी जातात. त्यावेळी अनेक वेळा पर्यटक या खिंडीमध्ये फोटो काढण्यासाठी थांबतात.
ही खिंड धोकादायक झाली असून, कोणत्याही क्षणी खिंडीच्या डोंगराचे दगड व माती निखळू शकते. त्यामुळे एखादी दुर्घटनादेखील घडू शकते, असे स्थानिकांनी वारंवार सांगितले असताना देखील मावळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या सूचनांकडे कायम कानाडोळा केला. आता दरड कोसळल्यामुळे रस्ता काही प्रमाणात बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळल्याच्या घटनेची दखल घेऊन तात्काळ हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच धोकादायक दगड काढून टाकण्याची कार्यवाही करावी, मागणी या भागातील नागरिक व प्रवाशांनी केली आहे.