नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शनिवारी कथित जमीन घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट, 2002 च्या तरतुदींअंतर्गत ईडीने हेमंत सोरेन यांना जारी केलेले हे सातवे समन्स आहे.
या आधीची सहा समन्स सोरेन यांनी धुडकावून लावली आहेत. ही शेवटची संधी असून तुम्ही सात दिवसांत ईडीपुढे हजर राहून आपले म्हणणे नोंदवावे असे त्यांना सांगण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांत ठिकाण, तारीख आणि वेळ नमूद करण्यास सांगितले आहे.
ईडीने 12 डिसेंबर रोजी चौकशीसाठी सहावे समन्स जारी केले होेते परंतु त्यावेळीही सोरेन यांनी ईडीपुढे हजर राहणे टाळले होते. एजन्सीला लिहिलेल्या पत्रात, सोरेन यांनी म्हटले आहे की, त्यांनी ईडीला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती प्रदान केली आहे. ईडीने त्यांना जी माहिती हवी आहे ती त्यांना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रावरून घ्यावी असेही सोरेन यांनी त्यांना कळवले आहे.