विश्वस्त मंडळाकडून माहिती संकलित; पुणे जिल्ह्यातील कागदपत्रे मिळाली
जेजुरी- महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरी खंडेरायाच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या बागायती जमिनी असल्याची माहिती आता उघड होत आहे. या जमिनी पूर्वीच्या काळातील भाविक भक्तांनी देणगीद्वारे खंडेराया चरणी देण्यात आलेल्या इनाम वतन वर्ग 1, 2, 3 या वर्गवारीत असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
विश्वस्त मंडळाने या जमिनींबाबत माहिती संकलित करून नोंदी, 7/12 उतारे व फेरफार उतारे नकाशांच्या नकला मिळविण्याचे काम सुरु केले असून या कामाला यश मिळत आहे. मात्र, मागील काळातील विश्वस्त मंडळीना काही जमिनींचा अपवाद वगळता कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती याचे मुख्य कारण म्हणजे देवसंस्थानकडे स्थावर जंगम मालमत्तेचे कोणतेही दफ्तर अथवा नोंदी नसल्याने शेतजमिनी शोधण्यात अडथळा निर्माण होत आहे. केवळ ऐकीव माहितीच्या आधारेच जमिनी शोधण्याचे काम सध्या सुरु आहे.
श्री खंडोबा देव, श्री मार्तंड देव, श्री मल्हारी देव जेजुरी या नावे 7/12 उताऱ्यावर नोंदी असलेल्या जमिनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील गावांमध्ये आढळून येत असल्या तरी ताबा व कसणारे इतर किंवा तेथील स्थानिक शेतकरी आहेत. विशेष म्हणजे या जमिनी बागायती असून कसणारे व ताबा असलेले शेतकरी देवसंस्थानला कसलेही उत्पन्न देत नाहीत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सणसर, तरंगवाडी. फलटण येथे सांगवी, पुरंदर तालुक्यात पिसर्वे येथे देवसंस्थानच्या मालकीच्या शेतजमिनी असून दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, फलटण तालुक्यातील गिरवी या गावी कोट्यवधी रुपयांची शेतजमीन खंडोबा देवाची असल्याची माहिती उजेडात आली आहे. सदरील जमिनींची कागदपत्रे देवसंस्थान विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये महसूल प्रशासनाकडून खंडेरायाच्या इनाम वर्ग जमिनींची माहिती “माहिती अधिकार’ कायद्यात मागविण्यात आली आहे.
खंडेराया हे प्राचीन दैवत असून ते कष्टकऱ्यांचे बळीराजा, सरदार, दरकदार, राजे-महाराजे यांचे कुलदैवत असल्याने या घराण्यांकडून विविध गावातील जमिनी इनाम वतनाद्वारे खंडेरायाच्या चरणी आल्या असाव्यात. देवसंस्थानकडे या बाबत कोणतेही रेकॉर्ड नसल्याने ऐकीव तसेच माहितीच्या आधारे किंवा माहिती उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित ठिकाणी महसूल विभागाकडे जाऊन कागदपत्रे प्राप्त करून घेण्याचे काम विश्वस्त मंडळाला करावे लागत आहे.
सद्यस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये माहितीचा अधिकाराचा वापर करण्यात आला आहे. या जमिनीमधून देवसंस्थानला कोणतेही उत्पन्न मिळत नाही तसेच सद्याच्या विश्वस्त मंडळाने जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडे देवसंस्थानला उत्पन्न देण्याची मागणी केली होती. तशा बैठकाही मागील काळात झाल्या होत्या. परंतु, शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या खंडेरायाच्या जमिनी व सद्य स्थितीतील जमिनीमधून देवस्थानला उत्पन्न मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
- पश्चिम महाराष्ट्रातही जमीनी…
जेजुरी देवस्थानवर दोन वर्षापूर्वी सात विश्वस्तांची नियुक्ती धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली, यांच्या प्रयत्नातून देवसंस्थानच्या इनाम वर्गातील जमिनी काही ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आणि कागदपत्रे उपलब्ध करण्यास सुरुवात झाली. त्याद्वारे खेड तालुक्यामध्ये 11 एकर व फलटण तालुक्यामध्ये 13 एकर जमीन मल्हारी मार्तंडाची असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनीच्या बाबत सध्या माहिती घेण्याचे व कागदपत्रे उपलब्ध करण्याचे काम विश्वस्त मंडळ करीत आहे, अशी माहिती देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले.