अमेरिकेतील निवडणूकीत चार भारतीयांचा विजय

वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या स्थानिक निवडणूकीत चार भारतीय अमेरिकन नागरिकांनी विजय मिळविला आहे. यात एका मुस्लिम महिलेचाही समावेश आहे. गझाला हाश्‍मी असे तिचे नाव असून त्यांची व्हर्जिनियाच्या सिनेटरपदी निवड झाली आहे. ही निवडणूक जिंकून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.

अमेरिकेला जाण्याआधी हैदराबादमध्ये हाश्‍मी यांना सर्वजण मुन्नी नावाने ओळखायचे. आज याच हैदराबादच्या मुन्नीने अर्थात गझाला हाश्‍मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. गझाला हाश्‍मी 50 वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. व्हर्जिनियाच्या सिनेटर बनणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन मुस्लिम आहेत. अमेरिकेच्या राजकारणात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत असताना हाश्‍मी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. मागच्यावर्षी इल्हान उमर आणि राशिदा तलैब या दोन मुस्लिम महिलांनी अमेरिकन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

व्हर्जिनियामध्ये भारतीय, हिस्पॅनिक्‍स आणि कोरियन लोकांची मोठी संख्या आहे. इमिग्रेशन हा तिथे एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी अलीकडेच आपली नोकरी सोडली. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.

तसेच माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे व्हाईट हाऊस तंत्रज्ञान धोरण सल्लागार म्हणून काम करणारे सुहास सुब्रमण्यम हे व्हर्जिनिया स्टेट हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव म्हणून निवडले गेले आहेत. कॅलिफोर्नियातील भारतीय-अमेरिकन मनो राजू यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या पब्लिक डिफेंडर पदाची निवडणूक जिंकली आहे. याशिवाय उत्तर कॅलिफोर्नियात डिंपल अजमेरा यांनीही विजय मिळविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.