मुंबई -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात पंचांकडून सातत्याने चुका होताना दिसत आहेत. शनिवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ललित यादव याला टीव्ही पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड या पंचाने अशाच चुकीच्या पद्धतीने धावबाद दिले.
गुजरातने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या सामन्यातील निकालापेक्षा पंचांच्या चुकीचीच चर्चा जास्त झाली. या सामन्यात दिल्लीचा ललीत यादव याला 12 व्या षटकात वादग्रस्त धावबाद दिले गेले.
यादव व कर्णधार ऋषभ पंत चोरटी धाव घेण्यासाठी धावले. मात्र, त्यांच्यात कॉलवरून गोंधळ उडाला व यादव क्रीझ गाठण्यासाठी वेगाने धावला. क्षेत्ररक्षक अभिनव मनोहरने विजय शंकरकडे चेंडू फेकला. यावेळी स्टम्प उडवण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय आधी स्टम्पला लागला व बेल्स पडल्या. त्यानंतर त्याने चेंडूने एक बेल्स उडवली. तरीही ऑक्सेनफोर्ड यांनी यादवला धावबाद दिले.