मुंबई – मुंबईतील ‘लालबाग राजा’च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब होत असल्याचे वृत्त समोर आले आहे. लालबाग परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व व्यापारी हे पोलिसांवर नाराज असल्याकारणाने प्राणप्रतिष्ठेस विलंब होत आहे.
सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम रहात पोलिसांशी मागण्यांवर चर्चा सूरू केली आहे. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतो आहे.
लालबागचा राजा मंडळ परिसरात व्यापाऱ्यांची अनेक दुकानं आहेत. पण कोविड नियमांमुळे आणि गणेशोत्सव काळात लालबागचा राजाच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ शकते या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.