आजच्या क्रीडादिनी होणार गौरव
पुणे – क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधून त्यांच्या विकासासाठी लक्षपूर्वक कार्य करणाऱ्या पुण्यातील “लक्ष्य’ या संस्थेचा आज (शनिवार) राष्ट्रीय क्रीडा दिनी खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
खेळाडू आणि त्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट बाळगून गेले दशकभर लक्ष्य ही संस्था आपले काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल अलीकडेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात घेत, त्यांना खेल प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.
खेळ आणि त्यात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या खेळाडूंसाठी काहीतरी करण्यासाठी पुण्यातील काही क्रीडाप्रेमी एकत्र आले आणि त्यांच्या पहिल्याच बैठकीत यासाठी लक्ष्य ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत विविध आठ क्रीडा प्रकारातील शंभरहून अधिक खेळाडूंची ही संस्था पालक बनली आहे, अशी माहिती लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी दिली.
खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे प्रत्येक खेळाडूचे उद्दिष्ट असते. पण, या खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणे देखील गरजेचे असते. आम्ही खेळाडूंसाठी आर्थिक मदत उभी करताना त्यांचा सरावाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेतली, असे लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
आठ क्रीडा प्रकारातील 35 खेळाडूंना पाठिंबा देत आहे. यात 2021 ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली मुष्टीयुद्धपटू पूजा राणी, सिमरजीत कौर, कुस्तीपटू सुनील कुमार, बुद्धिबळपटू विदित गुजराथी या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे, असे लक्ष्यच्या प्लेअर मॅनेजमेंटचे मुख्य व ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू अभिजीत कुंटे यांनी सांगितले.
राष्ट्रपतींकडून होणार आज गौरव
राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजे शनिवारी (29 ऑगस्ट) नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लक्ष्यचा गौरव करण्यात येईल. करोनाच्या संकटामुळे हा सोहळा यावेळी आभासी पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई, सहसचिव अमेय येरवडेकर, खजिनदार भरत शहा, सदस्य रितू नाथानी, सत्येन पटेल, नरेंद्र फिरोदिया, मनिष मेहता आदी उपस्थित राहणार आहेत.