नवी दिल्ली -करोना संकटाच्या सावटात पुढील महिन्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनाला प्रारंभ होण्याच्या 72 तास आधी सर्व खासदारांनी करोनाविषयक चाचण्या कराव्यात, अशी सूचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शुक्रवारी केली.
संसदेचे अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. करोना संकटकाळात होणाऱ्या त्या अधिवेशनाच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी बिर्ला यांनी येथे एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
त्या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्रालय, दिल्ली सरकार, आयसीएमआर आणि डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बिर्ला यांनी खासदारांना करोनाविषयक चाचण्या करून घेण्याचे आवाहन केले.
अधिवेशनावेळी खासदारांबरोबरच अधिकारी आणि पत्रकारांचाही संसद भवनात राबता असेल. त्या सर्वांच्याच करोनाविषयक चाचण्या होतील, असे बिर्ला यांनी म्हटले. गरज भासल्यास अधिवेशन काळातही चाचण्या घेतल्या जातील, असेही त्यांनी सूचित केले.
करोना संकटामुळे यावेळी अधिवेशनकाळात बरेच नवे बदल दिसतील. सकाळी आणि संध्याकाळी अशा वेगवेगळ्या वेळी राज्यसभा आणि लोकसभेच्या बैठका होतील, असे समजते.