Narendra Modi – लक्षद्वीप एक लहान द्वीपसमुह आहे मात्र त्याचे हृदय फार मोठे आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्रशासित लक्षद्वीपमधील ११५० कोटी रूपयांच्या विविध योजनांचे उदघाटन आणि पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते. येथे मिळालेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो असून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
केंद्र सरकारकडून लक्षद्वीप येथे अलिकडच्याच काळात सुरू करण्यात आलेल्या विकासकामांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा नव्या योजनांचे आज उदघाटन केले आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिला आणि लहान मुले सहभागी झाली होती.
यावेळी बोलताना केंद्रातील अगोदरच्या सरकारांवर टिप्पणी करताना मोदी म्हणाले, आपल्या पक्षाचा विकास करणे यालाच अनेक दशके त्यांचे प्राधान्य होते. आपल्या काळात या राजकीय पक्षांनी दूरची, दुर्गम सीमा भागातील अथवा समुद्राच्या मध्य भागातील राज्यांकडे दुर्लक्ष केले.
मात्र गेल्या दहा वर्षांत आपल्या सरकारने सीमा आणि सागरी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. २०२० मध्ये तुम्हाला गॅरेंटी दिली होती की पुढील १००० दिवसांत तुम्हाला वेगवान इंटरनेट सुविधा प्राप्त करून दिली जाईल. आज कोची- लक्षद्वीप सबमरिन ऑप्टीकल फायबर योजनेचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला आता शंभरपट जास्त वेगाने इंटरनेट उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज कावारत्ती येथे एका सौर उर्जा प्रकल्पाचे उदघाटन केले. ही लक्षद्वीपमधील पहिली सौर उर्जा योजना आहे. याशिवाय कल्पेनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरण योजनेचे उदघाटन करण्यात आले तर पाच ठिकाणी अंगणवाडीची पायाभरणीही त्यांच्या हस्ते करण्यात आली.