मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु आहे. राज्यातही महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे.
अमरावतीमधून अपक्ष खासदार नवनीत राणा यांना बावनकुळे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत एकीकडे बच्चू कडू यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी होतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी राणा यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्याआधी राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती.
नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लढणार हा मोठा प्रश्न आहे. राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. तर, दुसरीकडे बच्चू कडू यांनीदेखील त्यांनी प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली असली तरी चिन्ह, पक्ष कोणता असणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.