पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई तर झालीच पाहिजे. त्याचबरोबर अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी करण्यात यावी. अधिकृत होर्डिंग्ज हेदेखील पूर्णपणे नियमानुसार लावलेले नाहीत. अनेक होर्डिंग जीवघेणे ठरू शकतात.
त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून अनधिकृत आणि अधिकृत असले तरी नियमबाह्य असलेल्या होर्डिंगवर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली. त्याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिले आहे.
शहरासह उपनगरांत अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठी आहे. त्याकडे आकाश चिन्ह विभाग आणि अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. होर्डिंगचे स्ट्रक्चर बनविताना चुकीच्या पद्धतीने बनवण्यात येते. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर दुर्घटना झाल्यास सबधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, तसेच अधिकृत होर्डिंगची लांबी आणि उंची, तसेच होर्डिंग्जचे रस्त्यापासून असलेले अंतर हे पाहणेही आवश्यक आहे.