तू स्वतःशी हट्ट धर हो प्रेरणेचा स्रोत तू
हो स्फूर्तिदायक अन तरीही सहजसुंदर गीत तू
हो उद्याचे स्वप्न तू बन या नभीचा सूर्य तू
दे सुंदराचं दान दे तेजोनिधीचा स्पर्श तू
हो यज्ञ हो तू यत्न अन हो चंद्रशीतल आग तू
पेटून दे तुझिया कृपेने संकटे कर भस्म तू
तू असावे एक तारा अढळ हो हो ध्रुव तू
तू मोहरावे पाझरावे दे जगाला प्रीत तू
दे स्वतःला एक शब्द वचन दे अन एक धर्म
जाणूनी सांभाळ रे तू जीवनी मग तेच मर्म
तव लाभले मज लाभले आहेच सारे जीवनी
बघ शोधूनी पाहू तरी पण काय आहे आत्मनी
या शोधण्याच्या अंतरंगी भेटूया विश्वामध्ये
मग परतुया घेऊन गंध त्या कळ्यांना उमलुनी
शेवटी उरतोच राजा या मनीचा भावरंग
निर्मळाचा तू मनाला लागू दे वेडाच छंद
-ऋषिकेश कदम