नवी मुंबई – करोना विषाणूंचा संसर्ग पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून 10 फिलिपाईन्स नागरिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 मधील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नवी मुंबईतील वाशी सेक्टर 9 नुरुल इस्लाम ट्रस्टच्या प्लॉट क्रमांक 61 नुर-ए-मस्जिद या ठिकाणी फिलिपाईन्समधून 10 नागरिक अनधिकृतपणे राहत होते. हे सर्व 10 मार्च 2020 ते 16 मार्च 2020 दरम्यान वाशीत राहिले होते.
यातील 6 जण इतर ठिकाणी राहायला गेले होते. तर 3 जण मात्र वाशीतील मशिदीतच राहिले होते. या तिघांपैकी एका 68 वर्षीय आणि 42 वर्षीय फिलिपाईनच्या नागरिकास करोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी ही माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीत अन्य 13 जणांना आणि नेरूळमधील एका नागरिकाला करोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते.
मात्र या संसर्गजन्य गंभीर आजाराचा प्रादुर्भाव झालेला असतानाही त्यांनी कोणतीही माहिती न देता त्या ठिकाणी वास्तव्य केले. यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम स14, साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3,4, महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना 2020 कलम 11 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.