नगर (प्रतिनिधी) – शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, केवळ दोन तास पुरेल एवढाच ऑक्सिजन काही हॉस्पिटलला शिल्लक आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आज दुपारी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. मात्र, त्यात काही ठोस तोडगा निघाला नाही, असे सूत्रांकडून समजले.
जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट सक्रीय असून, दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे 17 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील अनेक रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. अनेकांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे.
अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती असताना आता दुसरेच संकट उभे ठाकले आहे. शहरातील सर्वच रुग्णालयात दोन ते चार तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक आहे. जिल्ह्यात पाच एजन्सीमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. पण, आज एकाही एजन्सीकडे ऑक्सिजन शिल्लक नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, आज दुपारी ऑक्सिजन संपत आल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. शहरातील सर्वच हॉस्पिटलकडे दोन ते चार तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे सांगितले. ऑक्सिजन संपल्यानंतर अघटित घटना घडू शकतात, ही धोकादायक स्थिती जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आणून दिली.
हीच परिस्थिती सप्टेंबर 2020 मध्ये निर्माण झाली होती. त्यावेळी आयएमएने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. सात महिन्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. 16 एप्रिल 2021 रोजी पुन्हा जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकार्यांनी एमआयडीसीतील एक प्लँटमधून ऑक्सिजन उपलब्ध होईल, असे सांगितले. पण, संबंधित व्यक्ती फोन उचलत नाही. रात्री उशिरा ऑक्सिजनचे टँकर येतील असे आयएमएच्या सदस्यांनी सांगितले. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेण्याचे थांबविले आहे. तर, काही रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात एकाही एजन्सीकडे ऑक्सिजन शिल्लक नाही. त्यामुळे दोन खासगी हॉस्पिटलला जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन दिला आहे. रात्री जिल्ह्याला वीस केएल ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही.
डॉ. राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी
सर्वच हॉस्पिटलमध्ये दोन ते चार तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. नव्याने ऑक्सिजन कधीयेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नवीन रुग्ण घेणे थांबविले आहे.
डॉ. सचिन वहाडणे सचिव, आयएमए.