IPL 2021 : अमित मिश्राच्या फिरकीने मुंबईची घसरगुंडी; दिल्लीचा दणदणीत विजय

चेन्नई – फिरकीपटू अमित मिश्राच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अमित मिश्राने २४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईला २० षटकांत ९ बाद १३७ धावा करता आल्या. प्रत्युत्तर दिल्ली संघाने १९.१  षटकांत १३८ धावा करून विजयाची नोंद केली.

विजयासाठी १३८ धावांचे आव्हान मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ ७ धावा करून बाद झाला. दरम्यान शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ (३३) यांनी दुसऱ्या विकेटसाठी धावांची भागीदारी केली. स्मिथ बाद झाल्यानंतर धवन देखील ४५ धावा करून बाद झाला. त्यानंतर ललीत यादवने डाव सावरत असताना कर्णधार ऋषभ पंतही (७) बाद झाला. त्यानंतर शेमरॉन हेटमायर (नाबाद १४) आणि ललीत यादव (नाबाद २२) यांनी दिल्लीचा विजय साकार केला.

नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. मात्र सलामीवीर क्विंटन डी कॉक तिसऱ्याच षटकात बाद झाला. स्टोनिसने पंतकरवी झेलबाद करत मुंबईला पहिला धक्‍का दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत मजबूतीने डाव सावरण्यास सुरुवात केली. मात्र सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने सूर्यकुमार यादवला बाद केले. सूर्यकुमारने 15 चेंडूत 4 चौकार खेचत 24 धावांची खेळी केली.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर रोहित शर्माने काही आक्रमक फटके मारले. परंतु, नवव्या षटकात अमित मिश्राने कमाल करत सेट झालेल्या रोहित शर्माला बाद करत मोठा अडसर दुर केला. रोहित 30 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. मात्र दोन चेंडूंच्या अंतराने लगेच त्याने हार्दिक पंड्याला देखील बाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे 10 षटकांत मुंबईची 4 बाद 78 अशी अवस्था झाली आहे.
कृणाल पंड्याही 1 धाव काढून परतला. ललित यादवने त्याच्या त्रिफळा उडवित त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखविला. यानंतर अमित मिश्राने मुंबईला आणखी एक मोठा धक्‍का देत कायरन पोलार्डला 2 धावांवर पायचित केले. मिश्राने तीन विकेट घेत मुंबईची मधळी फळी मोडीत काढली.

या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26, तर यादवने 23 धावा केल्या. दिल्लीकडून अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. तर आवेश खानने 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आज संघात एक बदल करत ऍडम मिलनेला वगळत ऑफस्पिनर जयंत यादवला संघात स्थान दिले. तर दिल्लीने देखील दोन बदल करत लुकमन मेरीवाला आणि ख्रिस वोक्‍स यांना वगळून अमित मिश्रा आणि शिम्रोन हेटमायर यांना संधी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.