राजेंद्र भुजबळ
शिर्डी – साईभक्तांना राहण्यासाठी शिर्डीत साई आश्रम 1 आणि 2 ही भक्तनिवासे उभारण्यात आली आहेत. परंतु सध्या या भक्त निवासात सुविधा कमी आणि अडचणीच जास्त उभ्या राहिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असूनही भक्त निवासाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांत नाराजी पसरली असून, या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या सव्वाशे कोटी रुपये देणगीतून साई संस्थानने साई आश्रम 1 व साई आश्रम 2 या भक्तनिवास इमारतीची निर्मिती केली आहे. साई आश्रम 1 याठिकाणी एसी व नॉन एसी अशा पंधराशेहून अधिक रूम्स भाविकांना अत्यल्प दरात मिळतात. भाविकांना याठिकाणी मोफत जेवणाचीही व्यवस्था आहे. मात्र, अनेक वर्षांपासून याठिकाणी मेंटेनन्स केले गेले नाही. त्यामुळे अनेक रूम्समधील बेड, बेडशीट, बाथरूम, एसी, पाण्याचे नळ, खिडक्या, दरवाजे यांची दयनीय अवस्था झाल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
वास्तविक याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्याही प्रमाणापेक्षा जास्त असूनही रूम्सची, तसेच परिसराची स्वच्छता नसते. भाविकांच्या अंघोळीच्या सोयीसाठी असणारे इलेक्ट्रिक बॉयलर बंद अवस्थेत असूनसुद्धा याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षा कर्मचारी फक्त नावालाच असून, अनेक ट्रॅव्हल्स एजंट हे थेट साई आश्रमाच्या परिसरात बिनधास्त तळ ठोकून असतात.
भाविकांव्यतिरिक्त अनेक अपप्रवृत्तीच्या लोकांची वर्दळ असते. प्रवेशद्वारालगतच अनेक छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला दुकाने थाटली असून, नगर-मनमाड हा रस्ता रहदारीचा असल्याने याठिकाणी दुर्दैवाने अपघात झाला, तर मोठी जीवित हानी होऊ शकते.
एकंदरीतच याठिकाणी दररोज हजारो भाविक राहतात. मात्र, त्यांच्या राहण्याच्या रूम्सची दुरवस्था व सुरक्षा याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून, भाविकांच्या सुविधेसाठी निर्माण केलेले हे भक्तनिवास आजही स्वच्छता आणि मेंटेनन्सची वाट पाहत आहे हे साई संस्थान प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणेच म्हणावे लागेल.
आमच्याकडून भलेही जास्त पैसे घ्या; पण त्याबदल्यात निदान सुविधा तरी चांगल्या द्या. कारण साई संस्थानचे नाव फार मोठे आहे. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी आम्हाला वेगळाच अनुभव आला.
स्नेहल पटेल, साईभक्त, मध्य प्रदेश