शिर्डी – शिर्डीचे साईबाबा हे पांडुरंगाच्या रूपात दर्शन देतात, हीच श्रद्धा मनी बाळगून शिर्डीत भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर साई समाधीचे दर्शन झाल्यानंतर अनेक भाविकांनी साईंच्या खिचडी प्रसादाचा लाभ घेतला.
साईंच्या शाबुदाना खिचडीचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. या दिवशीचा प्रसाद हा राज्यातील भाविक तसेच शिर्डी पंचक्रोशीतील भाविकांसाठी एक वेगळीच पर्वणी आहे. साई संस्थानच्या माध्यमातून भाविकांना दिल्या जाणाऱ्या या महाप्रसादमध्ये 6 हजार किलो शाबुदाना, 5 हजार किलो शेंगदाणे, 2 हजार किलो बटाटा यासह डालडा, मिरची पावडर व साखर एकत्र करून तब्बल 12 टन साबूदाणा खिचडीचा प्रसाद बनविण्यात आला होता. शेंगदाण्याचे झिरकं, शाबुदाना खिचडी, भगरीचा शिरा, बटाट्याची चटणी, दही हे सर्व पदार्थ भाविकांना आश्चर्यचकित करत होते.
कारण एरवी भाजी, चपाती, वरण भात हे प्रसादालयात मिळत असते. तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या ताटात हा प्रसाद पाहून व त्याचा आस्वाद घेऊन “शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीचा प्रत्यय येऊन पांडुरंगाचे दर्शन व प्रसाद मिळाल्याने सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघावयास मिळाला. प्रत्येकाला पोटभर खिचडीचा प्रसाद देताना साई संस्थानने केलेले उत्कृष्ट नियोजन व आयोजन पाहून अनेकांनी साई संस्थान प्रशासनाला धन्यवाद दिले. दिवसभर पन्नास हजारांहून जास्त भाविकांनी साईंच्या खिचडीचा लाभ घेतला.
आज शिर्डीत येऊन आम्हाला पांडुरंगाचे दर्शनही झाले.साईंच्या खिचडीचा प्रसादही मिळाल्याने आम्ही धन्य झालो.
– गणपत चौधरी (साईभक्त) धुळे