#TeamIndia : भारतीय संघ बनणार मजूर

जूनपर्यंत क्रिकेटच क्रिकेट

चेन्नई – भारत व इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरूवात झाली असून पहिले दोन सामनेही पार पडले आहेत. आता येत्या जून महिन्यापर्यंत भारतीय क्रिकेट संघ जवळपास प्रत्येक दोन दिवसाआड सामना खेळणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी, 3 एकदिवसीय व 5 टी-20 सामने होतील. या मालिकेतील अखेरचा सामना 28 मार्च रोजी होईल. त्यानंतर 11 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. म्हणजे दोन्ही स्पर्धेतील अंतर केवळ 13 दिवसांचेच आहे. टी-20 लीगचा अंतिम सामना 6 जूनला होईल. भारतीय संघ जागतिक कसोटीअजिंक्‍यपद स्पर्धेला पात्र ठरला तर त्यांना 18 जूनपासून लॉर्डसवर होणाऱ्या अंतिमसामन्यात खेळावे लागेल.

दरम्यान, आयपीएलचे सामने आठ ऐवजी 3 किंवा 4 ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. कारण, करोनाचा धोका टाळता येईल. येथे बायोबबल वातावरण बनवले जाईल. मंडळाने टी-20 मुश्‍ताक अली ट्रॉफीचे केवळ सहा ठिकाणी सामने घेतले. आयपीएल सुरू करण्याचा निर्णय गर्व्हनिंग कौन्सिलच्या बैठकीत घेतला गेला आहे. 11 एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होईल त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटू व्यस्त होणार आहेत.

येत्या काळात भारतीय क्रिकेटपटूंना एकूण 138 दिवसांत खेळाडूंना 5 कसोटी, 3 एकदिवसीय, 5 टी-20 तसेच आयपीएलचे 14 सामने खेळायचे आहेत. खेळाडू एकूण 47 दिवस मैदानावर असतील. म्हणजे पुढील पाच महिने प्रत्येक तिसऱ्या दिवशी खेळाडू सामना खेळेल. जानेवारी 2018 पासून संघाचा विचार केल्यास भारताने सर्वाधिक 131 सामने खेळले. इंग्लंड (121) दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया (112) तिसऱ्या, वेस्ट इंडीज (110) चौथ्या आणि पाकिस्तान (108) पाचव्या स्थानी आहे.

दुखापतींपासून कसे वाचणार

खेळाडूंना दुखापतींपासून दूर ठेवण्याचे काम संघ व्यवस्थापनाचे आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचे 8 खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यानंतर आपल्या व्यस्त वेळापत्रकावर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. जानेवारी 2018 पासून भारताकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार केल्यास कर्णधार विराट कोहली सर्वात पुढे आहे. त्याने 103 सामने खेळले. रोहित शर्मा 98 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे त्रस्त आहे. मात्र, तो 71 सामन्यांसह पाचव्या स्थानी आहे. आता क्रिकेटपटू एखाद्या मजुराप्रमाणे व्यस्त होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.