कोपरगाव : तालुका करोना मुक्त झाला पण पुन्हा एक बाधित आला

कोपरगाव (प्रतिनिधी)  : करोना संसर्गजन्य आजारातुन कोपरगाव तालुका दुसऱ्यांदा मुक्त झाला. नागरिक सुटकेचा श्वास सोडत असताना दोन दिवस गेले आणि पुन्हा तालुक्यात करोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झाली. तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची नाशिक येथील खाजगी प्रयोगशाळेत करोनाची तपासणी केली असता त्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

कोपरगाव तालुक्याच्या शेजारील तालुक्यात करोना बाधीत रुग्णांची संख्या शतकी पार झाली असताना कोपरगाव पुन्हा एकदा करोना मुक्त तालुका झाला असला तरी शेजारच्या तालुक्यामुळे नागरिकांची धाकधुक सुरूच आहे.

शुक्रवारी तालुक्यातील करोना बाधित रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले. आत्तापर्यंत १३ रुग्ण करोना बाधीत निघाले होते. बाधीतासह त्यांच्या संपर्कातील व संशयित अश्या २२९ लोकांच्या तपासण्या केल्या त्यात १३ बाधित निघाले तर १ बाधित महीलेचा मृत्यु झाला १२ बाधीत रुग्णापैकी ४ रुग्णावर नगर येथे उपचार करण्यात आले तर उर्वरीतावर कोपरगाव कोव्हिड केअर सेंटर येथे यशस्वी उपचार करून सर्व बाधीत रुग्ण करोनामुक करण्यान वैद्यकीय यंत्रणेना यश मिळाल्याची माहीती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सध्या तालुक्यात एकही करोना बाधित रुग्ण नाही मात्र १३ संशयीतांची वैद्यकीय तपासणीचे अहवाल येणे बाकी होते तेही अहवाल निरंक अर्थात निगेटिव्ह आल्याने सध्याच्या स्थितीत कोपरगाव करोना विरहीत तालुका राखण्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज असताना पुन्हा शनिवारी दुपारी एक व्यक्ती करोना बाधीत आढळला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतील समन्व, राजकीय पाठबळ,नागरीकांचे सहकार्य, समाजसेवी संस्थानी केलेली मदत या सर्वांच्या बळावर तालुका करोना मुक्तच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, विषेश वैद्यकीय अधिकारी वैशाली बडदे, पोलीस निरीक्षक अनिल कटके,राकेश मानगावकर, व त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी करोना मुक्त कोपरगाव ठेवण्यासाठी रात्रीचा दिवस केल्यामुळेच पुन्हा करोना मुक्तीचा दिवस उजाडला पण एका बाधित व्यक्तीमुळे नागरिकांची व प्रशासनाची धाकधुक पुन्हा सुरू झाली.

दरम्यान, तालुक्यातील शेवटच्या चार करोना बाधितावर यशस्वी उपचार करून त्यांना करोना मुक्त केल्याच्या आंनदात संपुर्ण वैद्यकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आनंदात करोनामुक्त रुग्णावर पुष्पवृष्टी करुन सुखरुप रुग्णवाहीकेतुन त्यांना घरी सोडले. करोनामुक्त रुग्णांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानत समाधान व्यक्त केले. प्रशासकीय यंत्रणेने दोन दिवसाचा मोकळा श्वास घेतला आणि पुन्हा एका बाधीत रुग्णामुळे कोपरगाव तालुक्याची चिंता वाढवली.

Leave A Reply

Your email address will not be published.