सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी – जिल्ह्यात कोरोना सध्या आटोक्यात आहे. तथापि दिवाळीचा सण दोन दिवसावर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुंबई तसेच इतर भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यामध्येआर.टी.पी.सी.आर व रॅपिड ॲन्टीजन टेस्ट वाढविण्याच्या सूचना दिल्या.
आरोग्य यंत्रणेच्या समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी घेतली. त्यावेळी बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.जे. नलावडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.