नोकरी पेक्षा शेती ठरतेय सरस

तरुण शेतकऱ्याने घेतले एकरी 105 टन ऊस उत्पादन

मांडवगण फराटा (पुणे) – कष्टाला पर्याय नाही, असे म्हणतात हे खरं आहे, ग्रामीण भागात शेतीत कष्ट करत मिळणाऱ्या उत्पन्नातून किमया साधली जाऊ शकते, हे रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील अशोक बारवकर या युवा शेतकऱ्याने एकरी 105 टन उसाचे उत्पादन घेत नोकरी पेक्षाही शेती सरस ठरते हे सिद्ध करुन दाखवले आहे.

शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात भीमा नदीच्या काठावरील गावांतील क्षारयुक्‍त जमिनीत एकरी 40 ते 45 टन ऊस उत्पादन काढणे शेतकऱ्यांना मुश्‍कील असते. परंतु याच भागातील युवा शेतकऱ्याने एकरी 105 टन उत्पादन घेऊन नवा विक्रम केला आहे. या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात उभी, आडवी नांगरट केली. शेतामध्ये शेणखत, उसाची कंपोस्ट मळी वापर करून शेतीची मशागत करुन 86032 या जातीचे बेणे वापरुन 105 टनाचे उत्पादन घेतले.

बारवकर यांनी या ऊस पिकासाठी काढलेल्या सात फुटी पट्ट्यामध्ये काकडीचे आंतरपिक मल्चिंग पेपरचा वापर करून काकडीचे तीन लाख रुपये उत्पन्न घेतले. यावर्षी वरुणराजाने चांगली साथ दिल्यामुळे उसाची चांगली वाढ झाली. सरासरी 45 ते 48 कांड्यावर ऊस होता. एका उसाचे वजन तीन किलो 700 ग्रॅम पर्यंत होते. ऊस तुटल्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी राजेश थोरात व त्यांच्या सहकारी मित्रांनी उसाच्या प्लॉटला भेट दिली व ऊस उत्पादन वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

शेतात अपार कष्ट केल्यानंतर एकरी 105 टन उत्पादन मिळाले. नोकरीपेक्षा शेती केव्हाही सरस ठरत आहे. यामध्ये एक एकरात आंतरपिक काकडीचे आंतरपिक घेतले. त्यातुन तीन लाख व मुख्य पीक ऊस शेतातून 105 टन विक्रमी उत्पादन मिळाले. एका वर्षात एक एकरात शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. परिसरातील शेतकऱ्यांनीही असा प्रयोग केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल.
-अशोक बारवकर, ऊस उत्पादक शेतकरी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.