रायगड – माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. ही दुर्घटना पुण्याहून कोकणात जात असताना घडली आहे. या अपघातात बसमधील दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ही बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, 55 जखमी आहेत.
जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.