शारजा – सुनील नरेनने केलेल्या गोलंदाजीनंतर फलंदाजीतील चमकदार कामगिरी तसेच त्याला साथ देताना अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर कोलकाता संघाने क्वालिफायर 2 गटातील सामन्यात प्रवेश केला असून आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी येत्या बुधवारी होणार आहे.
बेंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात थाटात झाली. शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांवर दडपण आणले होते. मात्र, हे दोघेही स्थिरावल्यावर बाद झाले. गिल 29 तर, अय्यर 26 धावा काढून परतल्यानंतर भरात असलेला राहुल त्रिपाठी साफ अपयशी ठरला. यावेळी नितीश राणा व सुनील नरेन यांनी डाव सावरत संघाला शतकी मजल मारुन दिली.
राणाने 23 तर, नरेनने 29 धावांची खेळी केली. त्याचवेळी महंमद सिराज, हर्षल पटेल व यजुवेंद्र चहल यांनी धावांवरही अंकुश राखला. अखेर कर्णधार इयान मॉर्गन व शकिब अल हसन यांनी आणखी नुकसान न होऊ देता अखेरच्या षटकात आवश्यक असलेल्या 6 धावा काढल्या व संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना क्वालिफायर गटात प्रवेशही मिळवून दिला. बेंगळुरूकडून सिराज, पटेल व चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी सुनील नरेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने बेंगळुरूला 20 षटकांत 7 बाद 138 धावा असे रोखले व अर्धी लढाई जिंकली. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने देवदत्त पडीक्कलसह डाव सुरु केला. पडीक्कल 18 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा काढून बाद झाला आणि ग्लेन मॅक्सवेल वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाने कोहलीला पुरेशी साथ दिली नाही.
कोहलीने बेंगळुरूकडून सर्वाधिक 39 धावा केल्या. त्यात त्याने 33 चेंडूत 5 चौकार फटकावले. नरेनने आपल्या फसव्या गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूच्या चार प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याला सुरेश साथ देताना लॉकी फर्गुसनने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 138 धावा. ( विराट कोहली 39, देवदत्त पडीक्कल 21, ग्लेन मॅक्सवेल 15, शाहबाज अहमद 13, एबी डीविलियर्स 11, सुनील नरेन 4-21, लॉकी फर्गुसन 2-30). कोलकाता नाईट रायडर्स – 19.4 षटकांत 6 बाद 139 धावा. (शुभमन गिल 29, सुनील नरेन 29, व्यंकटेश अय्यर 23, नितीश राणा 23, दिनेश कार्तिक 10, शकिब अल हसन नाबाद 9, इयान मॉर्गन नाबाद 5, यजुवेंद्र चहल2-16, महंमद सिराज 2-19, हर्षल पटेल 2-19).