#IPL2019 : चेन्नईसमोर कोलकाताचे तगडे आव्हान !

रसेलला रोखण्यासाठी रणनिती आखण्याची गरज

चेन्नई: आयपीएलच्या बाराव्या मोसमात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान आज सामना होणार असून दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज असल्याने आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सूकता क्रीडा प्रेमींना असणार आहे.

आयपीएलच्या चालू मोसमात कोलकाताच्या संघाने पाच सामन्यांमधील चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जने देखील आपल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. यावेळी कोलकाताचा पराभव हा दिल्ली कॅपिटल्स संघा विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये झाला आहे. तर, चेन्नईने मुंबई विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करला आहे.

त्यातच कोलकाताने पहिल्या सामन्यापासून चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले आहे. त्यात त्यांचे सलामीवीर ख्रिस लिन, सुनिल नारायण तसेच मधल्या फळीतील रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी प्रभावी कामगिरीए करत गरज पडेल तेंव्हा संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असून कोलकाताच्या संघाची मुख्य ताकत असलेल्या आंद्रे रसेलने 268.83च्या स्ट्राईक रेटने संघाला धाव करुन देताना लागोपाठ तीन सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्यांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

तर, त्याने 207 धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या व्यतिरीक्त रॉबिन उथप्पा 172 आणि नितिश राणा हे देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. त्याच बरोबर कोलकाताच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना बांधून ठेवण्यात यश मिळवले असून राजस्थानच्या संघातील स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर आणि बेन स्टोक्‍स सारख्या फटकेबाजीत माहिर असणाऱ्या फलंदाजांना डॉट चेंडू खेळायला भाग पाडून कोलकाताच्या गोलंदाजांनी सामन्यात दबाव वाढवलेला आहे.

तर, दुसरीकडे चेन्नईच्या संघाने पहिल्या सामन्या पासूनच प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवत आपले चार सामने सहज जिंकले आहेत. ज्यात त्यांनी बंगळुरूसारख्या संघाला केवळ 70 धावांमध्येच रोखत आपल्या गोलंदाजीची दखल घ्यायला भाग पाडले. यावेळी त्यांच्या संघातील इम्रान ताहिर आणि ड्‌वेन ब्राव्होयांनी सात बळी मिळवत पर्पल कॅपच्या यादित स्थान मिळवले आहे. त्यातच फलंदाजीमध्ये त्यांचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ ड्यु प्लेसीस यांनी देखील चांगली कामगिरी केली असून मधल्या फळीतील अंबाती रायडूचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली असून त्यांच्या गोलंदाजांना आजच्या सामन्यात रसेलला रोखण्यासाठी विशेष रणनिती आखण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, नितिश राणा, रिंकू सिंह, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.