‘प्ले ऑफ’पासून मुंबई केवळ एक विजय दूर
कोलकाता नाईट रायडर्स Vs मुंबई इंडियन्स
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – ईडन गार्डन मैदान, कोलकाता
कोलकाता – मागिल मोसमात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर असून आज त्यांच्य समोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असणार आहे. कोलकाताच्या संघाला यंदाच्या मोसमातील आपले आव्हान टिकवून ठेवण्यास आजच्या सामन्यात विजय आवश्यक असून त्यांच्यासमोर आज “करा वा मरा’ची परिस्थिती असणार आहे.
यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने 11 सामन्यात सात विजयांसहीत चौदा गुण मिळवले असून ते सध्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहेत. तर कोलकाताच्या संघाने यंदाच्या मोसमात चार विजय आणि सात पराभव पत्करले असल्याने त्यांचे आठ गुण असून सध्या ते सहाव्या स्थानी आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवून बाद फेरी गाठण्यास कोलकाताचा संघ उत्सुक असणार आहे.
मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानासहीत बाद फेरी गाठण्यास उत्सुक असणार असून आजच्या सामन्यात ते कोलकाताच्या संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील असणार असून त्यांना या सामन्यात आंद्रे रसेलला रोखण्यास विशेष रणनिती आखण्याची गरज आहे. कारण आंद्रे रसेल खेळपट्टीवर असल्यास कोलकाताच्या संघाला कोणतेही आव्हान कमी नसून ते कोणत्याही परिस्थितीतून सामना जिंकण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे आंद्रे रसेलला रोखण्यास रोहित शर्मा कोणत्या प्रकारची रणनीती आखतो यावर सामन्याचे चित्र अवलंबून आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शुभमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, नितीश राणा, रिंकू सिंह, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एन्रीच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम.