कोल्हापूर – सोशल मीडियावर आपल्याला दररोज सुविचार पाहायला मिळतात. मात्र हे सुविचार पोस्ट करणारे खरच त्या सुविचाराप्रमाणे वागतात का ? हा मोठा प्रश्न आहे. अनेकजण सोशल मीडियावर ज्ञान पाजळत असतात मात्र वयक्तिक आयुष्यात ते तसे वागत नसल्याचे अनेकदा समोर येते. असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात घडला आहे. सोशल मीडियावर ज्ञान पाजळणारा पोलिस अधिकाऱ्याला 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. सोमनाथ देवारम चळचूक (वय 48, नेमणूक जयसिंगपूर पोलिस ठाणे) असे लाच स्विकारणाऱ्या पोलीसाचे नाव आहे.
चळचूक यांनी फायनान्समध्ये गेलेले वाहन परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच घेतली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईनंतर चळचूक याची डिसेंबर महिन्यातील एक सोशल मीडियावरी पोस्ट व्हायरल होत आहे. सदर पोस्टमध्ये चळचूक यांनी लिहिले होते की, “84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही?”
दरम्यान, सोशल मीडियावर ज्ञान पाजळणारा चळचूक आता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. माणूस सोशल मिडियावर जसा दिसतो तसा नसतो, आता हाच लाचखोर पोलिस बघा, फेसबुकवर काय पोस्ट करतो आणि प्रत्यक्षात काय करतो. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाल्या आहेत. अनेकांनी या पोस्टवरून जात कमेंट करत फौजदाराचा क्लास घेतला आहे.