कोल्हापूर, सांगलीला पुन्हा पुराचा धोका

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे
करूळ घाटात दरड कोसळली
अतिवृष्टीमुळे 4 राज्यमार्ग व 18 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद
एनडीआरएफच्या तीन तुकड्या दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे सलग पाचव्या दिवशीही कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीने आपली वाटचाल इशारा पातळीकडे सुरू ठेवली आहे. त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या तीन टीम दाखल झाल्या आहेत. दोन टीम शिरोळला, तर एक टीम कोल्हापुरात आहे.

दरम्यान गगनबावडा तालुक्‍यात दिवसभर अतिवृष्टी सदृश्‍य पाऊस सुरू असल्याने करुळ घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे करूळ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटावर स्थिर करण्यात आले असल्याने कृष्णेची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पुरचा धोका वाढला आहे.

कोल्हापूरच्या पश्‍चिम घाट माथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, शाहूवाडी परिसरात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे अद्याप उघडेच आहेत. धरणातून 7112 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. जोरदार पावसाने 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी जवळपास 38 फुटांवर पोहचली आहे. सर्वच प्रकल्पातून विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सर्वच नद्या पात्रा बाहेर पडल्या आहेत. कोकणाकडे जाणारा कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 4 राज्य मार्ग तर 18 प्रमुख जिल्हा मार्ग बंद करण्यात आले आहेत.

“कोयने’चे दरवाजे पुन्हा आठ फुटांवर

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून शनिवारी सकाळपासून पाणलोट क्षेत्रातील नवजा, महाबळेश्वर, कोयनानगर याठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. कोयना धरणाचे साडेचार फुटांवर असणारे दरवाजे रविवारी पुन्हा आठ फुटांवर स्थिर करण्यात आले आहेत.

धरणात 59 हजार 708 क्‍युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 69 हजार 739 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा कोयना नदीवर असणारे मुळगाव पूल व मोरगिरी विभागाला जोडणारे नेरळे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या विभागातील गावांचा संपर्क तुटला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढू लागली आहे. यामुळे पाणी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडे चार फुटावर असणारे धरणाचे दरवाजे पुन्हा शनिवारी दुपारी आठ फुटाने उघडण्यात आले. सध्या धरणाची पाणीपातळी 2162.1 फूट झाली असून पाणीसाठा 103.40 टीएमसी झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.