मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) बुधवारी या आठवड्यात दुसऱ्यांदा कोविड काळातील एका कथित घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर झाल्या. पेडणेकर सकाळी 11 वाजता दक्षिण मुंबईतील ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचल्या असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या आधीही त्यांची या प्रकरणात दोन तास चौकशी झाली आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी तक्रार दिली होती त्यानुसार किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोविडच्या काळात महापालिकेकडून आरोग्य सुविधांच्या व्यवस्थापनात आणि मृत करोना रुग्णांसाठी बॉडी बॅग, मास्क आणि इतर वस्तूंच्या खरेदीमध्ये निधीचा गैरवापर आणि अनियमितता झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. किशोरी पेडणेकर या नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 या कालावधीत मुंबईच्या महापौर होत्या.
6 सप्टेंबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने पेडणेकर यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र हायकोर्टाने त्यांना चौकशीत सहकार्य करण्याची सुचना केली आहे. दरम्यान पेडणेकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप या आधीच फेटाळले आहेत.