मुंबई : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील बाळासाहेबांना याठिकणी जाऊन अभिवादन केले. दरम्यान यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरेंवर टीका करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलायची आहे की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असे म्हटले होते. यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, “दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका”.
शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असंही त्यांनी सांगितलं.