“मी माझ्या बाबांना एवढं कोसळेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्यांना जेव्हा रात्री ११च्या सुमारास फोन येत होते. तेव्हा ते अस्वस्थ दिसले. नंतर कळलं की फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. त्यावेळी काहीच सुचत नव्हतं. ते पार कोसळून पडले होते”
पुण्यातील एम. जी रोडवरील फॅशल स्ट्रीटला भीषण आग लागली. त्यात सर्वच दुकानं जळून खाक झाली. किशोर खिलारे यांची देखील फॅशल स्ट्रीटला चार दुकानं होती. गेले २३-२४ वर्ष झाले त्यांनी एक एक करुन ही दुकानं विकत घेतली होती. किशोर यांना फॅशन स्ट्रीटमध्ये सगळे अण्णा नावाने हाक मारतात. सगळ्यांच्या मदतीस कायम तत्पर असणारे अण्णा फॅशन स्ट्रीट जळताना पाहून स्वत:च हतबल झाले होते.
गेले २०-२२ वर्ष झाले त्यांनी फॅशन स्ट्रीटसोडून अनेक ठिकाणी व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र फॅशन स्ट्रीनं त्यांना अण्णा ही ओळख दिल्याने त्यांचा फॅशन स्ट्रीटमधून पाय हालत नव्हता. त्यामुळे त्यांनी तिथेच व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
“संचारबंदी असल्यामुळे नियमांचं पालन करुन आम्ही सगळ्यांनी १० वाजता दुकानं बंद केली. रोज दुकानं बंद झाल्यावर थोडावेळ गप्पा करायचो मात्र संचारबंदीमुळे सगळेच घरी निघालो. काही वेळानंतर मला सतत फोन आले. दुकानं जळाली म्हणून सांगण्यात आलं. माझी चार दुकानं होती मोठ्या कष्टानं आम्ही सर्वांनी तिथे दुकानं घेतली होती. जळाली म्हटल्यावर मला सुचेनासं झालं. शेवटचा फोन आला आणि मी कोसळलो.”, असं किशोर सांगतात.
लॉकडाऊनमुळे फॅशन स्ट्रीट ३ महिने पुर्णपने बंद होते. ही पुण्यातील स्वस्त बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पुण्यातील विविध भागातून अनेक लोक याठिकाणी खरेदीसाठी गर्दी करतात. फॅशन स्ट्रीट रेडिमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. नुकतीच ही बाजारपेठ रुळावर येत होती. येथे फार कमी जागेत किमान ५०० ते ६०० दुकानं आहेत. पुण्यातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये फॅशन स्ट्रीटचा समावेश होते.
लॉकडाऊनमध्ये आमचं बरंच नुकसान झालं. फॅशन बदलली की माल तसाच पडून राहतो. मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन झालं होतं. त्यावेळी आम्ही जरा घाबरलो होतो. सगळं सुरळीत होईल अशी आशा करत डिसेंबर महिना आला. मी काही दिवसांपुर्वी कर्ज घेऊन लाखो रुपयांचा माल भरला. आज तो माल माझ्या डोळ्यादेखत खाक झाला, अशी हळहळ किशोर यांनी प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
किशोर यांना दोन तरुण मुली आहेत. चार चोकटीचा संसार आहे. त्यासगळ्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे ही दुकानं होती. घरात कर्ताधर्ता एकच पुरुष त्यामुळे आता पुढे नियतिनं नेमकं काय वाढून ठेवलंय? पुढे आमचं काय होणार ?, असे सगळे प्रश्न किशोर यांच्या सारख्या अनेक व्यापाऱ्यांपुढे आहे.
“मी माझ्या बाबांना एवढं कोसळेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्यांना जेव्हा रात्री ११च्या सुमारास फोन येत होते. तेव्हा ते अस्वस्थ दिसले. नंतर कळलं की फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली आहे. त्यावेळी सुचत नव्हतं. ते पार कोसळून पडले होते”, असं किशोर यांची मुलगी श्वेता खिलारे सांगते.