पुरंदर तालुक्यातील भिवडीत नोंदवला तहसीलदारांचा निषेध : स्मारकस्थळी शासकीय सुविधाच नाही
सासवड – भिवडी (ता. पुरंदर) येथे शासनाच्या वतीने दरवर्षी हुतात्मा राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येते. मात्र, यंदा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा न दिल्याने त्यामुळे तहसीलदारांनी राजे उमाजी नाईक यांचा अवमान केला आहे. आम्ही याचा निषेध व्यक्त करून तहसीलदारांना तात्काळ बडतर्फ किंवा निलंबित करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी यावेळी सांगितले.
भिवडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे स्मारक असून या स्मारकात उमाजी नाईक यांची 229 राष्ट्रीय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमापूजन, मानवंदना, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम झाले. यावेळी जय मल्हार क्रांती संघटना राज्य अध्यक्ष दौलतनाना शितोळे, पंचायत समिती सभापती नलिनी लोळे, एम. एम. मदने, भाजपचे तालुकाध्यक्ष आर. एन. जगताप, रवी खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने, चंद्रकांत खोमणे, रोहित अभंग, तुषार खोमणे, दिलीप चव्हाण, दीपक जावळे, प्रशासक पी.व्ही जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम जाधव यांनी केले. तर अमृत भांडवलकर यांनी आभार मानले. दररम्यान, सकाळी तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस केला पुष्पहार अर्पण.
- शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
यावर्षी करोनाचे संकट असल्याने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व संघटनांनी येथे येण्याचे टाळले खरे;परंतु शासनाच्या प्रतिनिधी म्हणून तहसीलदार काम पाहत असतात. तहसीलदारांच्या ताब्यामध्ये हे स्मारक असल्याने तहसीलदारांनी या स्मारकाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या विद्युत माळा, हार, फुले लावलेली नाहीत स्तंभाची देखील सजावट केलेली नाही, त्यामुळे भिवडी येथे संताप व्यक्त करीत तहसीलदारांचा निषेध नोंदवण्यात आला.
- जर प्रशासनाला हुतात्मा उमाजी नाईक यांचा विसर पडत असेल तर ही शोकांतिका आहे त्याचबरोबर याठिकाणी स्वच्छता व स्मारकाचे हार हार फुलांनी सजावट करणे गरजेचे होते ते केले नाही, त्यामुळे भाजपच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त केला.
– आर. एन. जगताप, अध्यक्ष, भाजप, पुरंदर तालुका