- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईलची वाहतूक करणारा टॅंकर उलटला. सर्व ऑईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारामार्ग सुमारे तीन तास बंद करण्यात आला होता. सोमवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ऑईल टॅंकर खोपोली-खालापूर दरम्यान आडोशी बोगदा या ठिकाणी सोमवारी सकाळी उलटला. उलटल्यानंतर टॅंकरमधून मोठ्या प्रमाणात ऑईल रस्त्यावर पसरले.
वाहने घसरू लागली याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. खासगी लहान वाहने ही वलवण लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविली, तर अवजड वाहने थांबविण्यात आली होती.
दरम्यान लोणावळा शहरात अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने गवळीवाडा नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ऑइलमुळे रस्त्यावर झालेला घसरडेपणा दूर करण्यासाठी “फायर ब्रिगेड’च्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्यात आला. तसेच ऑईलवर माती टाकण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.