पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची नवी दिल्ली येथील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमध्ये (आयसीसीआर) निवड झाली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही निवड तीन वर्षांसाठी झाली आहे.
भारताच्या परदेशी सांस्कृतिक संबंधांशी संबंधित धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि त्यांच्या अंमलबजावणीत भाग घेणे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध प्रस्थापित करणे आणि विकसित करणे ही या परिषदेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
कुलगुरू करमळकर यांच्या आजपर्यंतच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कामगिरीवर ही निवड करण्यात आली असल्याची माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे डॉ. नितीन करमळकर यांची पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची निवड झाली आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.