शिर्डी – अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकास हिमाचल प्रदेशात जाऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पळवून नेणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शिर्डी परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला 10 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये काम करणारा हरी सोनार (वय 22) याने हिमाचल प्रदेशात पळवून नेले होते. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल होताच शिर्डी पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील सिमला येथे जाऊन ज्या ठिकाणी हा तरुण पीडित मुलीला घेऊन गेला होता त्या ठिकाणी त्याला अवघ्या 4 दिवसांत ताब्यात घेतले. तपासी अधिकारी संभाजी पाटील, पोलीस नाईक कैलास राठोड यांनी ही कारवाई केली.