मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक मराठी नाटक लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या नाटकाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. “बाळासाहेबांचा राज’ असं या नाटकाचं नाव असून, येत्या 23 जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. या नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील भावनिक नातं उलघडणारं असल्याचं सांगण्यात आहे.
दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाच्या संहितेच उदघाटन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडलं होतं. तर, आता नाटकाचं पाहिलं आणि अधिकृत पोस्टर अनावरणही करण्यात आलं आहे.
दरम्यान, या नाटकाच्या घोषणेपासूनच सर्वांना नाटकाच्या सुरु होण्याची प्रचंड उत्सुकता होती. लवकरच आता ही प्रतीक्षा संपणार असून 23 जानेवारी रोजी हे नाटक सर्वांच्या भेटीला येणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या नात्यावर बोलणारी अशी कलाकृती पहिल्यांदाच समोर येत आहे. त्यामुळे सर्वांची नजर या कलाकृतीकडे लागली आहे.