पुणे – भांडणाच्या रागातून प्रियसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकानगर पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपीचा लातूरपर्यंत पाठलाग करून अवघ्या बारा तासात चिमुरड्याची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे सहकारनगर पोलिसांच्या टीमवर्कचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सुनील सोपान पांढरे (वय २६ रा. पांढरेवाडी, ता.गंगाखेड, जि.परभणी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला आणि सुनील यांची बारामतीमध्ये कंपनीत काम करीत असताना ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महिलेला पतीपासून दीड वर्षांचा मुलगा असून दोघे सोबत राहत नाही. काही दिवसांपुर्वी सुनीलने प्रियसीला तिच्या मुलासह बारामतीहुन पुण्यामध्ये फिरण्यास आणले होते. ते बालाजीनगरमधील लॉजमध्ये राहुन पुण्यात ठिकठिकाणी फिरत होते. दोन दिवसांपुर्वी (३ मे) दोघांमध्ये किरकोळ कारणामुळे वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे सुनीलने प्रियसीला मारहाण करून खोलीत कोंडून ठेवत मुलाचे अपहरण केले. प्रियसीने आरडाओरड केल्यानंतर लॉज व्यवस्थापकाने तिची सुटका केली. याप्रकरणी तिने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली. गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी तत्काळ तपासाला गती दिली.
तांत्रीक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढला असता, तो बसमधून मुळगावी जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड, भुजंग इंगळे व महेश मंडलीक हे लातूरला रवाना झाले. तपासाअंती १२ तासांमध्ये पथकाने आरोपी सुनील पांढरे याला बाळासह ताब्यात घेतले. बाळाला पुण्यामध्ये आणून आईच्या स्वाधीन करताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस श्रीमती स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी, एपीआय समीर शेंडे, बापु खुटवड, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, सागर सुतकर, महेश मंडलिक, प्रदिप बेडीस्कर, सागर शिंदे, मंगेश बोराडे यांनी केली.