Madrid Spain Masters 2024 Badminton :– भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरु झालेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधू ( PV Sindhu ) हिने कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पी. व्ही. सिंधू हिला गेल्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तिला जागतिक क्रमवारीत ४९ व्या स्थानावर असलेल्या वेन यू झँग हिचा सामना करावयाचा होता. पहिल्या गेममध्ये झँगकडून प्रतिकार मिळाला. मात्र ब्रेकनंतर सिंधूने थाटात पुनरागमन केले. सिंधू – झँग यांच्यामध्ये १४-१४ अशी बरोबरी झाली. त्यानंतर सिंधूने मागे वळून पाहिले नाही. सिंधूने ही गेम २१-१६ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधू हिच्या झंझावाती खेळासमोर झँगचा निभाव लागला नाही. सुरुवातीला ४-४ अशी आघाडी असलेल्या या गेममध्ये सिंधू हिने त्यानंतर ११-६ अशी आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. झँग हिला दबावाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. अखेर सिंधू हिने या गेममध्ये २१-१२ अशी बाजी मारली. तिने ३० मिनिटांमध्ये या लढतीत विजय साकारला.
अश्मिताचा पराभव
भारताची महिला खेळाडू अश्मिता छलीहा हिला मात्र पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चौथी मानांकित राचनोक इंतानोन हिने अश्मिता हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारला. इंतानोन हिने २१-१३, २१-११ असा विजय संपादन केला. अश्मिताचा २८ मिनिटांमध्ये पराभव झाला.
पुरुष एकेरीच्या आणखी एका सामन्यात माजी विश्वविजेता किदाम्बी श्रीकांतला ( Kidambi Srikanth ) राउंड ऑफ 32च्या फेरीत जपानच्या कू ताकाहाशीकडून 18-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.