Maha Urja $25K ITF women’s tennis championships ( Nagpur ) :- नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन (एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ३५००० डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत स्लोव्हानियाच्या दलिला जाकुपोविक हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत करत दुहेरी मुकुट संपादन केला.
रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत स्लोव्हानियाच्या जागतिक क्रमवारीत २१३ व्या स्थानी असलेल्या दलिला जाकुपोविकने कोरियाच्या येवानवू कुचा ६-१ ,६-२ असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 1तास 30मिनिटे चालला. या विजेतेपदाबरोबरच तिने आयटीएफमधील सातवे विजेतेपद पटकावले.
याआधी अंतिम सामन्याची नाणेफेक नागपुरचे पालिका आयुक्त आयएएस अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील एकेरीतील विजेत्याला करंडक, ३५ डब्लूटीए गुण व ३,२५,००० रुपये, तर उपविजेत्या जोडीला करंडक, २२ डब्लूटीए गुण व १७५०००अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, कुमार, स्पर्धा संचालक डॉ. सुधीर भिवापूरकर, एनडीएचटीएचे उपाध्यक्ष अशोक भिवापूरकर, एनडीएचटीएचे सहसचिव विक्रम नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा सचिव विजय नायडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.