नोएडा – दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता वाढली असून आता उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनीही नोएडा-दिल्ली सीमेवर ठाण मांडल्याने हा मार्गही बंद झाला आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांना जोडणारा प्रमुख रस्ताच शेतकऱ्यांनी अडवल्याने आता मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या उत्तर प्रदेशच्या लोकांनी चिला मार्गाचा वापर न करता डीएनडी किंवा कालिंदी कुंज रोडचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे शेतकरीही तेथे मोठ्या प्रमाणात जमू लागल्याने शेतकरी आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली आहे.
नोएडा सीमेवर जमलेले हे शेतकरी भारतीय किसान युनियनचे आहेत. मंगळवार रात्रीपासून हे शेतकरी तेथे जमू लागले असून त्यांची संख्या उद्यापर्यंत आणखी वाढेल, असे आंदोलनकर्त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनानेही तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. या शेतकऱ्यांना दिल्लीच्या हद्दीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.