पलक्कड (केरळ) – राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चा केरळातील माजी राज्य सचिव सी ए रौफ याला केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील (NIA arrests PFI leader C A Rauf from Palakkad) त्याच्या घरातून अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या रौफला काल रात्री पलक्कड जिल्ह्यातील पट्टांबी भागातील त्याच्या निवासस्थानी एजन्सीने छापा टाकून ताब्यात घेतले.
गेले अनेक दिवस तो एनआयएच्या रडार खाली होता. केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर या संघटनेशी संबंधीतांची देशभर धरपकड करण्यात आली. त्यावेळी रौफ फरार झाला होता.
पीएफआय ही संघटना इस्लामिक स्टेट या इस्लामिक दहशतवाद्यांच्या संघटनेशी संबंधीत होती अशी बाब तपासात समोर आली आहे. या संघटनेला बाहेरून मोठा निधी मिळत होता व त्या आधारावर त्यांनी भारतात देशविरोधी काम चालवले होते असा त्यांच्यावर आरोप आहे.