नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे उद्या नवी दिल्लीतील रामलिला मैदानावर तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्याच्या आदल्या रात्री त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्याशी विकास कामांवर चर्चा केली. दिल्लीच्या विकासासाठी पुढील तीन महिन्यात अग्रक्रमाने हाती घेतले जायच्या कार्यक्रमावर त्यांनी संबंधीत मंत्र्यांशी चर्चा केली.
केजरीवालांनी जुनेच मंत्रिमंडळ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून सहा विद्यमान मंत्रीही उद्याच केजरीवालांबरोबर शपथ घेणार आहेत. दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा ध्यास केजरीवालांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने केल्या जायच्या उपाययोजनांविषयीही त्यांनी मंत्र्यांबरोबर चर्चा केली. दिल्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा मोठ्या संख्याने आम आदमी पक्षाचे आमदार निवडून दिल्याने आपल्यावर त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आहे असे केजरीवालांनी या आधीच नमूद केले आहे.