भाजप आमदाराची केजरीवालांकडे मागणी
शिक्षकांना सन्मानेने निमंत्रीत करण्यात आल्याचा सरकारचा दावा
नवी दिल्ली – केजरीवाल यांच्या उद्याच्या शपथविधी सोहोळ्यासाठी दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहावे अशी सुचना करणारे एक सर्क्युलर सरकारने काढले आहे. ते सर्क्युलर मागे घ्यावे अशी मागणी दिल्लीचे नवनिर्वाचित भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री केजरीवालांकडे केली आहे.
हे सर्क्युलर म्हणजे हुकुमशाही आहे, त्यातून केजरीवाल सरकारची चांगल्या गव्हर्नन्सची प्रतिमा आणि दावा उघडा पडला आहे असे त्यांनी म्हटले आहे. या सर्क्युलर मुळे पंधरा हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तेथे शपथविधीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे. गुप्ता हे दिल्ली विधानसभेतील भाजपचे नेते असून ते यावेळी दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की आपण स्वता उद्या केजरीवालांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहोत.
दरम्यान दिल्ली सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे की सरकारी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिल्लीच्या विकासात मोठा योगदान दिले असल्याने त्यांना आम्ही उपस्थितीचे निमंत्रण दिले आहे. त्यांना हे निमंत्रण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षक हे दिल्लीच्या विकासाचे मुख्य शिल्पकार आहेत. भाजपने केंद्रात सरकार चालवताना तुमच्या कथिक विकास मॉडेल मध्ये शिक्षकांना सहभागी करून घेतले आहे काय असा सवालही आम आदमी पक्षाच्या सरकारच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.