नवी दिल्ली – दिल्लीतील करोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की करोना प्रसाराची स्थिती लक्षात घेता जून अखेरीपर्यंत दिल्लीत करोनाचे 60 हजार रुग्ण असतील असे सांगितले गेले होते पण प्रत्यक्षात 30 जूनअखेर राज्यातील करोना रुग्णांची संख्या 24 हजार इतकीच मर्यादित राहिली आहे.
मागच्या आठवड्यापासून नवीन करोना बाधितांचे प्रमाणही घटल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, दिल्लीत मागच्या आठवड्यात सरासरी रोज चार हजार नवीन रूग्ण आढळून येत होते पण त्याचे प्रमाण आता 2500 रुग्ण इतके झाले आहे.
दिल्लीत करोनाचे एकूण रुग्ण 87 हजार 360 इतके आहेत. तथापि, त्यातील ऍक्टिव्ह केसेस 26270 इतक्याच आहेत. बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीत चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येऊनही रुग्णांची संख्या मात्र कमी कमी होत चालली असल्याचे दिसत आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
पूर्वी 100 नमुने तपासले तर त्यातील सरासरी 31 केसेस पॉझिटिव्ह आढळून यायच्या पण आता हेच प्रमाण शंभर चाचण्यांमध्ये 13 रुग्ण इतके खाली आले आहे. दिल्लीत जून अखेरपर्यंत करोना रुग्णांची संख्या किमान 1 लाख इतकी असेल आणि जुलै अखेरपर्यंत ही संख्या 5.5 लाख इतकी होईल असा अंदाज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीच तज्ज्ञांच्या आधारे व्यक्त केला होता.