यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी साजरी होत आहे, पण दरवर्षी आनंदोत्सवात असणारा चंद्रभागेचा काठ आज अगदी निपचित पडला आहे. विठ्ठल मंदिर परिसरही सुनासुना आहे. असं असलं तरी प्रत्येकजण घरातूनच हात जोडून विठ्ठलाचे आशीर्वाद घेत आहे. आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा देत मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केले आहे. “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.’
विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी, असे ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.