नगर -महापालिका हद्दीतील केडगाव येथील शाहूनगर परिसरामध्ये करोनाबाधित चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाने उपाययोजना म्हणून हा परिसर सील करून कन्टेन्मेंट झोन घोषित केला आहे. 28 जून पर्यंत रा परिसर बंद असणार आहे.
केडगाव येथील शाहूनगर झेडपी शाळा, शाहूनगर चर्च,साईराम ट्रेडर्स, संकेत ढवळे, मथुरा ब्यूटीपार्लर, समर्थ निवास ते साईनगर प्रोव्हिजन स्टोअर्स परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित केला आहे. काल नगर शहरात नगर-कल्याण रोड परिसरातील 55 वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे. केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी व 12 वर्षांच्या मुलाचा अहवालही करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित परिसर सील केला आहे. त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत.
मात्र त्याचे अहवाल अद्याप आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर बॅंक कॉलनी, साई मंदिर, दक्षिण भाग-शारदा मंगलकार्यालय, साईराम ट्रेडर्सचे पश्चिमेचा परिसर, राजेंद्र टाक घर, शाहूनगर अंगणवाडी परिसर, रेणुकानगर, गणपती मंदिर परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या हलचालीवर निर्बंध घालण्यात आले आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
आठ रुग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील आठ करोनामुक्त रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आरोग्य विभागाने त्यांना निरोप दिला. यामध्ये नगर शहरातील एकासह संगमनेर तीन, राहाता दोन, कोपरगाव, शेवगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 206 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.